नगर – बालगायक, वादकांमध्ये आध्यात्मिक, धार्मिक संस्कार रुजावेत, संगीत साधनेच्या त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने येत्या रविवारी (दि. १०) सकाळी ९ ते ४ या वेळेत टिळक रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय सत्यसाई बालभजन महोत्सव होणार असल्याची माहिती संयोजक अशोक कुरापाटी यांनी दिली.
या महोत्सवाचे यंदाचे १४वे वर्ष आहे. या महोत्सवात राज्यभरातील सुमारे १५० बालगायक / वादक सहभागी होत असून, त्याचे फोटोसह माहिती असलेल्या गौरविकेचे या वेळी प्रकाशन करण्यात येणार आहे.
अल्पवयात संगीत साधनेत चमकदार कामगिरी बजावणारे दूरदर्शन वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या मालिकेतील विजेता जालन्याचा संकल्प संभाजी काळे, उपविजेती विर्दभकन्या अकोल्याची श्रृती रविप्रकाश भांडे व पुण्याची श्रेया युवराज गाढवे यांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या गायनाने या महोत्सवाची सुरुवात होऊन दुपारी २ ते ४ या वेळेत त्यांची नगरच्या रसिकांसाठी मैफिल सादर होणार आहे. त्यांच्याच हस्ते सहभागी बालकांचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र, गौरविका देवून सन्मान होणार आहे. या संगीत सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक भावभक्तीचा स्वरानंद मिळावा, असे आवाहन कुरापाटी यांनी केले आहे.