पुणे- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सायबर पोलिसांनी तिघांचे मोबाइल जप्त केले आहेत. जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (३४, रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) असे चौकशीला बोलाविण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी चाकणकर यांचे भाऊ संतोष बोराटे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
संबंधित कमेंट करणाऱ्यांची माहिती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळवली. यात रंजितराजे हत्तीहंबिरे, अमोल पाटील हे खाते सांभाळणाऱ्या संशयित लोकांचे मोबाइल नंबरची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. जयंत पाटीलला नोटीस देऊन जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेच वसंत खुळे याला सीआरपीसीप्रमाणे नोटीस देऊन त्याच्या मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तसेच प्रदीप कणसे यालाही नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळ, विद्या साबळे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, दिनेश मरकड, सुनील सोनेने, उमा पालवे यांच्या पथकाने केली.
“सोशल मीडियावर महिलांसंदर्भात बदनामीकारक, अश्लील मजकूर लिहल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे कोणी कमेंट, बदनामीकारक मजूकर लिहत असेल तर तक्रारकरण्यासाठी महिलांनी पुढे यायला हवं.” – रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)