शिरूर तहसीलदार, पोलिसांना दिले निवेदन
सविंदणे – मराठी पाटयाच्या मुद्यावर शिरूर शहरात मनसे आक्रमक झाली असून तात्काळ पाट्या मराठीत न बदलल्यास त्या पाट्यांवर काळे फासणार असल्याचे निवेदन मनसेने शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केले की, कोर्टाचा आदेश डावलून मराठी पाट्या न लावलेल्या आस्थापनांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. मराठी भाषा महाराष्ट्राचा अभिमान आहे.
भारतात प्रत्येक राज्यांतील लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. मराठी भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. प्रत्येक राज्यात त्याच भाषेत दुकानावर पाट्या आहेत. मग महाराष्ट्रात मराठी पाट्या लावण्यासाठी काय अडचण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापनांवर मराठीमध्ये नामफलक लावण्यात यावे, असा आदेश दिलेले आहेत.
मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात असा इशारा दिला आहे. परंतु शिरूर तालुका व शिरुर शहरात येणाऱ्या हद्दीत आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत कार्यवाही होणे गरजेचे आहे. ज्या आस्थापना त्यांचे नामफलक बदलण्यास विरोध करत असतील त्यांच्यावर तात्काळ आदेश देऊन कारवाई करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही तर त्यांच्याविरुध्द सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येईल. ज्या आस्थापनांच्या मराठीत पाट्या नाहीत. त्यांच्यावर मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करुन बोर्डावर काळे फासण्यात येईल, असे पत्र तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालयांना दिले आहे.
यावेळी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, मनसेचे शहराध्यक्ष ॲड. आदित्य मैड, संतोष नरके, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित माजी शहराध्यक्ष रवी लेंडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनसेचे रस्ते आस्थापनाचे शहराध्यक्ष संजोग चव्हाण, मनसेचे महिला आघाडीचे डॉ. वैशाली साखरे, तारूआक्का पठारे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.