ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला धडक
लोणी काळभोर – पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत एमआयटी कॉर्नरवर दुचाकी व टॅक्टर ट्रॉलीच्या झालेल्या भीषण अपघातात एमआयटी या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि. 8) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एमआयटी चौकात ही घटना घडली.
अथर्व कैलास पाटोळे (रा. नाशिक, सध्या लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रोहित अनिल पगार हा गंभीर जखमी झाला आहे.
एमआयटी या शैक्षणिक संस्थेत मागील वर्षापासून अथर्व हा आयटीत तर रोहित हा सीएसईत शिक्षण घेत होता. ते शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एमआयटी कॉर्नरवरुन लोणी काळभोर बाजुकडे निघाले होते. कॉर्नरपासुन पुढे पन्नास फुट अंतरावर गेले असता, त्यांच्या दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक झाली.
हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी ही दुभाजकाला धडकून दुसर्या बाजूला, पुण्याकडे जाणार्या रस्त्यावर पडली. यामध्ये अथर्व व रोहित महामार्गावर पडले. यावेळी अथर्व याच्या डोक्याला जबर मार लागला, तर रोहित याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी आरती खलचे व बाबासाहेब बांगर यांनी वाहतूक थांबवून रुग्णसेवेला फोन करून त्यांना लोणी काळभोर येथील रुग्णालयात पाठवले