पावसाअभावी पुरंदर तालुक्यातील स्थिती : ऐन सणात दर कडाडण्याची भीती
समीर भुजबळ
वाल्हे – दरवर्षी पुरंदर तालुक्यातील झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते; मात्र यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने, तसेच पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत ऐन पावसाळ्यात टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अद्यापपर्यंत सुरूच असल्याने, यावर्षी मागील वर्षापेक्षा तब्बल 139 हेक्टर हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड घटली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात पुरंदर तालुक्यात झेंडूचे उत्पादन अतिअल्प प्रमाणात येणार असून यामुळे तालुक्यात झेंडूच्या फुलांची कमतरता यावर्षी भाद्रपद बैलपोळा, नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी आदी मोठ्या सणांच्या वेळी झेंडूच्या फुलांचे दर वाढण्याची शक्यता निर्णाम झाली आहे.
पुरंदर तालुक्यातील नदी, ओढे-नाले, बंधारे, तलाव अद्याप कोरडेठाक आहेत. तसेच पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. यामुळेच, अनेक शेतकऱ्यांनी झेंडू पिकांचे उत्पादन घेतले नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी झेंडू पिकांची लागवड केली ती होती, त्यामधील अनेकांची झेंडूची झाडे पाण्याअभावी करपून गेली.
तसेच काही शेतकऱ्यांनी, तळहाताच्या फोडा प्रमाणे जपून, झेंडू जगविला. त्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना झेंडूंच्या फूल विक्रीतून दोन पैशांचे उत्पादन मिळेल, अशी आशा लागली आहे; मात्र ऑक्टोबर महिन्यांत उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतच चालला असून, यातून अनेकांचे झेंडू पिकच राहणार नसल्याने, दसरा-दिवाळी कशी साजरी करायची? असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर पडला आहे.