पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर (पुणे मेट्रो 3)च्या कामामुळे तसेच रस्त्यावर वाढलेल्या खासगी वाहनांच्या संख्येने वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीचा फटका पीएमपी बस सेवेला बसला असल्याने पीएमपी बसच्या लांब पल्ल्यांच्या खेपांची संख्या घटली आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पीएमपीकडून तीन मार्ग खंडित करण्यात आले आहेत.
या शिवाय बस मार्ग क्रमांक 42 कात्रज ते निगडी (भक्ती-शक्ती) या मार्गावर 6 शेड्युलची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर आता 380 दैनंदिन फेऱ्या होत्या. त्यांची संख्या वाढून 47 होणार आहे. परिणामी जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बस क्रमांक12 अप्पर डेपो ते निगडी हा बस मार्ग आता थेट असणार नाहीत. हा मार्ग शिवाजीनगरपर्यंत खंडित केला असून शिवाजीनगर या स्थानकावरून अप्पर डेपो तसेच निगडीसाठी प्रत्येक 10 मिनिटांनी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बस मार्ग क्रमांक 208 भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3 हा मार्गावर दिवसभरात 12 शेड्यूल होत्या. त्यातील 6 शेड्यूल या मार्गावर प्रत्येक एका तासाने असतील. तर खंडित केलेल्या सहा शेड्युल या महापालिकेपर्यंत खंडित करण्यात आल्या असून या गाड्या भेकराईनगर ते मनपापर्यंत असतील त्यांची वारंवारता प्रत्येक 25 मिनिटांना असणार आहे.
बस क्रमांक 228 कात्रज ते वडगाव मावळ हा बस मार्ग मुकाई चौकापर्यत खंडित करण्यात आला असून 30 मिनिटांच्या वारंवारतेने बस असतील, तर मुकाई चौक ते वडगाव मावळ या मार्गावर 3 बसेसच्या सरासरी 30 मिनिटांच्या वारंवारतेने फेऱ्या होतील.