वाघोली -औरंगाबाद येथे जायचे आहे, असे सांगत भाडे तत्वावर इर्टीगा कार घेऊन आलेल्या चालकाला चाकू, कोयत्याचा धाक दाखवून कार व पैशांची चोरी झाली आहे. याबाबत अल्पवयीन मुलासह तिघांना लोणीकंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. वाघोली (ता. हवेली) येथील बकोरी फाटा येथे चोरीची घटना घडली आहे.
सागर नवनाथ पिंगळे (वय 25), भूषण शरद माळी (वय 19) आणि अल्पवयीन मुलगा (तिघेही रा. वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा) असे चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघोली हद्दीतील बकोरी फाटा येथे तीन अज्ञात व्यक्तींनी औरंगाबाद येथे जायचे आहे, असे सांगून एक इर्टीगा कार भाडेतत्वावर मागवली. गाडीत बसल्यानंतर चालकाला चाकू, दोरी, कोयता गळ्याला लावला.
त्यानंतर गाडी एका सोसायटीच्या खाली नेऊन चालकाला जबर मारहाण करत त्याच्या जवळची रक्कम काढून घेतली. त्याच्या बॅंक खात्यातील दहा हजार रुपये गुगलपे मार्फत चोरट्यांनी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. चोरट्यांनी इरटीगा कार घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर चालकाने लोणीकंद पोलिसांत तक्रार नोंदवली.
गुन्ह्याचा तपास करत असताना लोणीकंद पोलीस ठाण्याचे समीर पिलाणे आणि दत्ता काळे यांना कोरेगाव भीमा येथे संशयित असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणीकंद पोलिसांनी सापळा रचून तिघांना जेरबंद केले कारदेखील जप्त केली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक केशव वाबळे, उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, शिवाजी ननवरे, राम दोंडगे, बाळासाहेब सकाटे, राजू मोमीन, विजय कांचन, श्रीमंत होनमाने, दत्तात्रय काळे, संतोष मारकड, समीर पिलाणे, धीरज जाधव, सुरज वळेकर, ऋषिकेश व्यवहारे यांनी केली.