बाजीराव बांगर यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद
नारायणगाव – येथील मुक्ताई मंदिराच्या हॉलमध्ये हभप बाजीराव महाराज बांगर यांनी सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन केले. याची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली आहे. या रेकॉर्डसाठी शेमेरो मराठी बाणा चॅनलचे सर्किट हाऊस, प्रॉडक्शन दिग्दर्शक सुनील खेडेकर व समन्वयक प्रमोद रणनवरे यांच्या टीमने वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी थेट प्रक्षेपण केले.
हभप बाजीराव महाराज बांगर हे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील असून कीर्तनकार, शिव शंभू चरित्र, कथाकार, प्रबोधनकार, व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे. कुठलाही सराव नसताना गेली बारा वर्षापासून कीर्तन सेवा करीत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली. पावनखिंडीच्या लढाईत 17 तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हे त्यांचे प्रेरणास्थान होते.
मावळ्यांच्या लढाईप्रमाणे सलग बारा तास कीर्तन करण्याचा त्यांनी मनात निश्चय केला. नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालयात मंगळवारी 14 जून रोजी सकाळी नऊ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. बांगर यांना किरणमहाराज बनकर, माऊलीमहाराज कुंजीर, नितीनमहाराज सुक्रे, विशालमहाराज बांगर, विठ्ठलमहाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार), चंद्रकांत निकम (विणेकर) टाळकरी, गायक, वादक यांच्यासह 22 जणांची साथ लाभली.
वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे वतीने मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, जयहिंद ग्रुपचे सचिव विजय गुंजाळ, रमेश भोसले, स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचे व मुक्ताई काळोबा देवस्थान ट्रस्टचे सहकार्य लाभले.