जाहिरात बॅनर, होर्डिंगवर आता क्यूआर कोड लावण्याची कार्यवाही
जुन्नर – जुन्नर शहराचे विद्रुपीकरण रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक जाहिरात बॅनर, होर्डिंग यावर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण, परवानगीचा कालावधी आदी माहिती असणारा क्यूआर कोड लावण्याची कार्यवाहीची अंमलबजावणी यापुढे सक्तीने होणार असल्याची माहिती जुन्नर नगर परिषद मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली.
जुन्नरमध्ये फ्लेक्स मुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्याकरिता नगर परिषद सभागृहामध्ये शहरातील फ्लेक्स तयार करणार्या व्यवसायिकांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख अमित रोकडे, बाळासाहेब भोसले यांच्यासह फ्लेक्स व्यवसायिक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये फ्लेक्सचे आकारानुसार दर लावण्याचा कालावधी, लावण्याची जागा, व्यावसायिक फ्लेक्स, स्वागत कमानी, फ्लेक्स न लावण्याच्या जागा आदी विषयांबाबत मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी सविस्तर माहिती दिली.
नगर परिषदेच्या लेखी परवानगी शिवाय शहरात फ्लेक्स लावता येणार नाहीत. तसेच अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार्यांविरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शासनाच्या फ्लेक्स बंदी च्या मोहिमेला शहरात नागरिक, व्यवसायिक, सामाजिक संघटना, संस्था यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान
सोमवारी (दि. 22) अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्ताने जुन्नरमधील सुमारे 30-35 विविध देवतांची मंदिरे व त्यांचा परिसर नगर परिषदेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबवून ही सर्व मंदिरे पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आली. तर मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात येऊन परिसर साफ करण्यात आला.
मुख्याधिकारी संदीप भोळे, आरोग्य विभाग प्रमुख नागराज बिराजदार, महादेव राभाडे, हरी गायकवाड, प्रकाश वनवे, शिल्पा निंबाळकर, चित्रा औटी, बाळासाहेब भोसले, स्वप्निल रोकडे आदींसह नगर परिषद कर्मचारी या विशेष स्वच्छता मोहिमे मध्ये सहभागी झालेले होते.
भाजीविक्रेत्यांना जागा देणार
नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने जुन्नर बस स्थानक, पाच रस्ता चौक, धान्य बाजार, सदाबाजार पेठ आदी भागात लावण्यात आलेले लहान मोठे फ्लेक्स या पथकाच्या वतीने लावलेल्या जागेवरून काढण्यात येऊन ते नगर परिषदेत जमा करण्यात आले. तसेच धान्य बाजार येथे सार्वजनिक रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांना या ठिकाणाहून हटविण्यात आले. येत्या तीन चार दिवसांत याबाबत बैठक आयोजित करून त्यांना व्यवसाय करण्याकरिता जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.