पुणे -सहायक लेखा अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या इंदापूर तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्तीस व तिच्या चालकास गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने विश्रांतवाडी येथील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय येथे केली.
32 वर्षीय महिला आणि आकाश महादेव शेलार (वय 26, रा. बारामती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक लेखा अधिकारी श्रीकांत बगलप्पा बनसोडे (वय 54) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
जिल्हा व्यवस्थापकाकडे केलेली तक्रार पाठीमागे घेण्यासाठी व सोशल मीडियाद्वारे बदनामी थांबविण्यासाठी सहायक लेखा अधिकाऱ्याकडून 10 लाखांची खंडणी मागण्यात आली. यातील पाच लाख देण्याचे फिर्यादीने कबुल केल्यावर संबंधित आरोपी त्यांच्या कार्यालयाबाहेर पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, याबाबत फिर्यादीने पोलीस आयुक्त कार्यालयात केली. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांनी याची दखल घेत तपासाच्या सूचना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या पथकाने सापळा रचून खंडणी स्वीकारण्यासाठी आलेल्या चालकाला पकडले. त्यानंतर महिला सामाजिक कार्यकर्तीलादेखील ताब्यात घेतले.
सरकारकडून मंजूर झालेली रक्कम लॉकडाऊन काळात लाभार्थ्यांना मिळाली नव्हती. ती फिर्यादीने स्वत: बळकावली असे धमकी व प्रचार आरोपी महिला करत होती. तिने पैसे घेताना दोन ते तीनवेळा वेगवेगळी ठिकाणे सांगितली. अखेर फिर्यादीने तिला इतर ठिकाणी येऊ शकत नाही, कार्यालयात येऊन पैसे घेऊन जा असे सांगितले. यामुळे ती कार्यालयात आली. मात्र, कार्यालयात पैसे न घेता तीने ते गाडीमध्ये ठेवण्यास सांगितले. – अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक