टेकवडेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया
मुंबई : माजी आमदार अशोक टेकवडे यांचे पुरंदरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांशी जमत नव्हते. तसेच, टेकवडे यांच्या राष्ट्रवादी सोडण्यामागे आणखी काही कारणे आहेत. मध्यंतरी त्यांच्याकडे इन्कम टॅक्स विभागाचाही छापा पडला होता. त्यावेळी काही कागदपत्रं मिळाल्याचे कानावर आले होते, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सोमवारी (दि. 15) सांगितले, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
अजित पवार सोमवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, माजी आमदार टेकवडे यांना मीच तयार केले होते. त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, पुढे जाऊन अध्यक्षही केले होते. तसेच आमदारकीचे तिकिटही दिले होते. पुरंदरमध्ये दादा जाधवराव यांचे वर्चस्व होते. तरीदेखील त्या निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून आणलं. त्यानंतरच्या काळात पक्षातील इतर नेत्यांशी त्यांचे जमत नव्हते. मी टेकवडे यांच्याशी आणि ज्यांच्याबरोबर त्यांचे जमत नव्हतं, त्यांच्याशीही चर्चा केली.
चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एखाद्याने मनाचा पक्का निश्चिय केला असेल तर तो काय कुणाचे ऐकेल असं नसतं. कारण, आज सकाळपासून माझ्या पक्षाचे पुणे जिलहाध्यक्ष प्रदीप गारटकर हे त्यांच्या घरी जाऊन बसले होते. त्यांनी सांगितले की, मी आणि माझ्या मुलाने भाजप प्रवेशाचा पक्का निर्णय घेतला आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
दुर्दैवाने त्यातून मार्ग काढता आला नाही
पवार म्हणाले की, अशोक टेकवडे यांचे वडील शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते होते. जवळार्जुन भागातील ते नेते होते. मी खासदार झाल्यापासूनच त्यांना जवळ केले होते. माझ्या परीने आणि पक्षाच्या माध्यमातून जी काय ताकद आणि शक्ती देण्याचा प्रयत्न केला. पण, स्थानिक वाद झाल्यानंतर आम्ही प्रयत्न करत असतो. पण, दुर्दैवाने आम्हाला त्यातून मार्ग काढता आला नाही. म्हणून टेकवडे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपत जाण्याचा टोकाचा निर्णय घेतला.