पारगाव शिंगवे – आंबेगाव तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक गावांमधील रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांमुळे रस्त्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
निरगुडसर, पिंपळगाव ते मंचर हा आंबेगाव तालुक्यातील रस्ता, तसेच पूर्वभागातील रांजणी, वळती ते शिंगवे ते पिंपरखेड ते शिंगवे ते पारगाव ते लाखणगाव ते पारगाव, लोणी धामणी, जारकरवाडी रस्ता आणि पारगाव गावठाण ते लबडेमळा रस्ता, याबरोबरच अनेक गावांमधील वाड्या-वस्त्यांमधील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होऊन येथे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाण साईडपट्ट्या उखडल्या आहेत, तर काही रस्त्यांना साईड पट्ट्या आहेत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही रस्त्यांवर अनेक ठिकाणी शेतकरी शेतीच्या पाईपलाईनसाठी आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइन नेण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करीत असतात, त्यामुळे अशा ठिकाणचे रस्ते खराब होत आहेत आणि खड्डे पडतात, अशा ठिकाणी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असते; पण दुरुस्ती करण्यात येत नाही. काही रस्त्यांना दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत, यामुळे समोरून आलेले वाहने दिसत नाहीत. परिणामी अपघात होत असतात.
पावसाने येथील अनेक रस्ते खराब झालेले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. या सर्व रस्त्यांनी नागरिकांची सतत वर्दळ असते, प्रवासी वाहने रोज जात असतात. शेतकरी आपल्या शेतातील तरकारी माल, कांदा, बटाटा, ऊस तसेच दूध वाहतूक करीत असतात. रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाताना या रस्त्याने सायकलवरून घसरून पडत आहेत. या खड्ड्यांमुळे चारचाकी तसेच मोटार सायकलींचे अपघातही होत आहेत. रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ते चांगले होत नसल्याचे येथील नागरिक सांगतात.
उपोषणाला बसणार
पिंपरखेड ते देवगाव य रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून देवगाव येथून पिंपरखेड येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खड्ड्यांत पाणी साचत असल्याने येथून जाताना गैरसोय होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देवगावच्या सरपंच दीपाली खांडगे, उपसरपंच दिलीप दाभाडे, सुभाष खांडगे, गावातील तरुणांनी आणि संजीवनी ग्रुपच्या वतीने देण्यात आला.