पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या सरळसेवा पदभरतीसाठी येत्या शनिवारपासून (दि.7) परीक्षेला सुरुवात होत आहे. ऑनलाइनद्वारे होणाऱ्या परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यात तीन पदांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. शनिवारी (दि.7) दोन आणि रविवारी (दि.8) असे दोन दिवसांत रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदांच्या परीक्षा होणार आहेत.
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी दिली. राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण 20 हजार जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती होत आहे. पुणे जिल्हा परिषदेत एक हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील 21 पदांच्या सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या सर्व पदासाठी 74 हजार 507 उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
शनिवारी रिगमन पदासाठी परीक्षा सकाळी अकरा वाजता आणि दुपारी तीन वाजता वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाची परीक्षा होणार आहे. तर रविवारी दुपारी तीन वाजता विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या तीन पदांच्या ऑनलाइन पदाच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज केलेल्या उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.