प्रांताधिकाऱ्यांचे उत्तर : ग्रामस्थ उपोषणावर ठाम
शेतकरी संघटनेचे गिरमे यांचा उपोषणाला पाठिंबा
सासवड – हरगुडे (ता. पुरंदर) येथील बालाजी स्टोन क्रशर मालकाने मुदत वाढीसाठी मंत्रालयात प्रस्ताव दाखल केला असल्याने क्रशरचा वीजपुरवठा खंडीत करणे आणि क्रशर सील करता येणार नाहीत, असे उत्तर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हरगुडे ग्रामस्थांना दिल्याने क्रशरबाबत सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे ग्रामस्थांनी गायकवाड यांना
स्पष्ट केले.
हरगुडे (ता. पुरंदर) गावातील गट क्र. 571 मधील अनधिकृत बालाजी स्टोन क्रशर सिल करून क्रशरचा विद्युतपुरवठा खंडित करावा या मागण्यांसह क्रशरच्या दि. 12 मे 2021 पासून गेले 9 महिने केलेल्या अनधिकृत उत्खननावर दंडात्मक कारवाई करून त्याचा बोजाचा सुनिल डांगी व पुरूषोत्तम डांगी यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करा. क्रशर सिल करावा या मागणीसाठी हरगुडे ग्रामस्थांचे उपोषण सोमवार (दि. 21) पासून सासवड येथील दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले आहे.
यावेळी सरपंच सरपंच भूषण ताकवले, सदस्य सुनिल यादव यांसह उपोषणकर्ते ग्रामस्थ तुकाराम ताकवले, कृष्णराव ताकवले, बाळासाहेब ताकवले, शांताराम ताकवले, चैतन्य ताकवले, सिकंदर ताकवले, अशोक ताकवले, संतोष उ ताकवले, संतोष ना ताकवले, सुरेश ताकवले, राजेंद्र ताकवले, विलास ताकवले, सुनील ताकवले, लता ताकवले, छाया ताकवले, रूक्मिणी ताकवले, मंदा ताकवले, सुमन ताकवले, छाया ताकवले उपस्थित होते.
शेतकरी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष दिलीप गिरमे यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयात चर्चा केली. या क्रशरची मुदत दि. 12 मे 2021 रोजी संपली आहे, त्याला मुदतवाढ मिळाली नाही. तहसीलदारांकडून क्रशर बंद ठेवण्याबाबत क्रशर मालकाला पत्र दिले आहे. क्रशरवर दंडात्मक कारवाई करू, असे आश्वासन प्रमोद गायकवाड यांनी दिले.