राहू बेटातील राजकीय समीकरणे बदलणार : गट पुनर्रचनेमुळे राजकीय अंदाज चुकले
भाऊसाहेब ठाकूर
राहू – दौंड तालुक्यातील नव्याने होणाऱ्या राहू- पिंपळगाव गटामुळे अनेकांचे अंदाज चुकल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी असलेल्या राहू -खामगाव गटावर आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व होते. या गटातील राहू गट व गणावर आमदार कुल यांचे वर्चस्व तर फक्त खामगाव गणावर माजी आमदार रमेश थोरातांचा कब्जा आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून राहू गट व गण ताब्यात घेण्यासाठी रणनिती आखली जात आहे. राष्ट्रवादीची तयारी भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
सध्या भाजपच्या गोटात शांतता असली तरी भाजपाकडून अंतर्गत अभ्यासात्मक तयारी सुरू होती. तर राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी राहू-खामगाव गटाच्या रचनेनुसार योग्य तयारी सुरू केली होती. परंतु बदललेल्या गट रचनेमुळे सर्वांच्या इच्छेवर सध्या तरी पाणी फिरल्याचे दिसत आहे. भाजपा व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अंदाज चुकले आहेत.
राहू- खामगाव गटातील गावे यवत- कासुर्डी गटात गेले. राहुतील काहींनी जुन्या राहू गणासाठी तयारी केली. परंतु राहू गाव हे नव्याने होत असलेल्या राहू- पिंपळगाव गणात गेल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. नवीन समीकरणामुळे अनेकांची चार वर्षांची मेहनत वाया गेली आहे. खामगाव गण बदलल्यामुळे कुल समर्थकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मागील गट रचनेत माजी आमदार रमेश थोरात समर्थक असलेली अनेक गावे ही शेजारच्या गटात गेल्यामुळे नवीन गणावर आमदारांचे वर्चस्व राहणार अथपथपपथाहे. हे आता स्पष्ट होत आहे, असा जाणकारांचा अंदाज आहे. नव्याने होणाऱ्या राहू गणात पिंपळगावसारख्या गावाची भर पडली आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत आमदार कुल समर्थकांच्या ताब्यात आहे. या गणातील पिलानवाडी, राहू ही गावे आमदार कुल यांना साथ देतात. त्यामुळे हा गण विद्यमान आमदारांच्या ताब्यात जाऊ शकतो, असा सूर राजकीय वर्तृळात
उमटत आहे.
आरक्षणाची स्थिती काहीही असली तरी आमदार गटाला कोणतीच अडचण येणार नाही, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीने नव्या उमेदीने तयारीला सुरूवात केली आहे. परंतु जुन्या खामगाव गणापेक्षा राहू गणातील राष्ट्रवादी हा भाजपाच्या तुलनेत बॅकफुटवर असतो. अनेक आघाड्याची पदे राहू बेटात आहेत. तरीही राष्ट्रवादीचा प्रभाव पडला नाही. येत्या निवडणुकांत मतांची टक्केवारी पाहिली तर राहू बेटात राष्ट्रवादी शांत नाही, हे लक्षात येत आहे.
कुलांच्या बालेकिल्ल्याकडे लक्ष
दौंड तालुक्यातील पूर्वीच्या राहू-खामगाव गणाकडे सर्वांचे लक्ष असते. हा गट आमदार कुल यांचा बालेकिल्ला आहे. यात खामगाव गणात थोरात गटाचे वर्चस्व आहे. नवीन गटरचनेमुळे राहूवर गटावर थोरात गट वर्चस्व प्रस्थापित करणार काय, याची चर्चा रंगली आहे. तालुक्यात आठ गट अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर झेडपीत दौंडला आता मानाचे पान मिळणार, हे निश्चित आहे. यासाठी राष्ट्रवादी तळागाळात संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे.