शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हिवरे रोड लगत दुचाकीला क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातानंतर क्रेनचे चाक अंगावरून गेल्याने आजीसह नातीचा मृत्यू झालला.
मैनाबाई गुरुनाथ राठोड (वय ५५), शिवानी संदीप राठोड (वय दीड वर्षे, दोघे रा. वाबळेवाडी विरोळे वस्ती शिक्रापूर, मूळ रा. कळमस, जि. गुलबर्गा, कर्नाटक), असे मृत्यू झालेल्या आजी- नातीचे नाव आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे लाल बाबू कुमार या क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील हिवरे रस्ताने गुरुनाथ राठोड व मैनाबाई राठोड हे दाम्पत्य शिवानी या नातीला घेऊन दुचाकीहून चाललेले होते.
देवखल मळा येथे पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या क्रेनची राठोड यांच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला. यावेळी राठोड दाम्पत्य त्यांच्या नातीसह रस्त्यावर पडले. देखील क्रेनचालक क्रेन घेऊन पुढे जाऊ लागला असताना क्रेनचे चाक मैनाबाई यांच्यासह शिवानीच्या अंगावरून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला.
याबाबत संदीप गुरुनाथ राठोड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. क्रेनचालक लाल बाबू कुमार उर्फ भोला कुमार (रा. सणसवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.