पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून तब्बल २ लाख ५७ हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये सर्वाधिक नोंदी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या दस्तांमधून सुमारे ३० लाखांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यातच सरसकट कुणबी नोंदी पडताळणी सुरू करण्यापूर्वीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात १२ हजार २५४ कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या होत्या.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील महसूल विभागाकडील दप्तरांमधून मराठा कुणबी नोंदी पडताळणी करण्याचा आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या आदेशानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तालुक्यांत तालुकास्तरीय कागदपत्रे पडताळणीसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. समित्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
पडताळणीत सन १९६७ पूर्वीच्या नोंदी पडताळण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सर्वसमावेशक नोंदी सापडत आहेत. शाळांचे दाखले, जन्म-मृत्यूच्या नोंदींमध्ये कुणबी नोंदींचे मोठे प्रमाण दिसून येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.