सहकारमंत्री वळसे पाटील : जयहिंद पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचा शुभारंभ
जुन्नर – सहकारी पतसंस्था जादा व्याजाचे आमिष दाखवून जनतेकडून पैसा गोळा करतात. पतसंस्थेत आर्थिक घोटाळे करून संचालक मंडळ गायब होते. अशा घटना राज्यातील काही पतसंस्थेच्या बाबत घडल्याने महाराष्ट्र शासन याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार आहे. पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण देऊन सर्वसामान्यांच्या ठेवींच्या रकमा सुरक्षित राहतील याकरिता लवकरच शासन निर्णय घेणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जयहिंद नागरी पतसंस्थेच्या जुन्नर शाखेचे उद्घाटन सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडलेे त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णु हिंगे, प्रदीप वळसे पाटील, युवा नेते अमित बेनके, सहायक निबंधक सचिन सरसमकर, शाम पांडे, महादेव वाघ, भास्कर बांगर, बाजीराव ढोले, प्रकाश ताजणे, विनायक तांबे, धनेश संचेती, संजय ढेकणे, उज्ज्वला शेवाळे, वैष्णवी चतुर, भाऊ कुंभार, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाब नेहरकर, विजय गुंजाळ, गणेश महाबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगल कुर्हे यांच्यासह संचालक मंडळ, सल्लागार, अधिकारी कर्मचारी, विविध पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते.
सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले की, नुसत्या व्याजावर उत्पन्न घेऊन सहकारी संस्था मोठी होत नाही. सहकार्याच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहिलेली आहे. ही अर्थव्यवस्था वाढवत वाढवत सर्वांनाच पुढे घेवून जायची आहे. असे यावेळी स्पष्ट करीत सर्व सामान्यांना वेळेवर आर्थिक मदत करण्याचे काम पतसंस्था करीत असून सहकार विभागाच्या बदलत्या नियमानुसार पतसंस्थेचे कामकाज नियोजनपूर्वक चालविणे गरजेचे आहे. याकरिता पतसंस्थेचे संचालक अधिकारी कर्मचार्यांच्या करिता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून सहकारातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
27 कोटी 11 लाखांच्या ठेवी
जयहिंद पतसंस्थेची स्थापना 1995 रोजी झालेली आहे. 2402 इतकी सभासद संख्या असून संस्थेत 27 कोटी 11 लाखांचा ठेवी असून कर्ज वाटप 21 कोटी 95 लाख रुपयांचे करण्यात आले आहे. इनपीए प्रमाण 9.87 टक्के इतकी असून संस्थेने प्रत्येक सभासदांचा 2 लाखांचा अपघात विमा काढलेला असून त्याचा हप्ता संस्थेकडून भरला जातो. संस्थेने कोअर बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गुलाब नेहरकर यांनी दिली.