पिरंगुट – मुळशी तालुक्यात 23 गावात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. चौदा ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहे.
23 ग्रामपंचायतीपैकी पंधरा ग्रामपंचायती ह्या पौड आणि मुळशी धरण परिसरातील असून सात ग्रामपंचायती ह्या मुठा खोऱ्यातील आहे. गेली अनेक महिने या ग्रामपंचायतीवर प्रशासक होता. अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणूक लढायची या हेतूने गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्यांची संख्या फार मोठी आहे. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार असल्याने या निवडणूकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.
मुळशी तालुक्यातही कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना ( एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), मनसे, आरपीआय आणि इतर पक्षाचेही कार्यकर्ते गावोगावी आहेत. तरीदेखील ग्रामपंचायत निवडणूक हि वैयक्तिक कामे, संपर्क आणि पैसे खर्च करण्याची ताकद यावरच लढवली जाते.
या गावचा सरपंच निवडून आल्यानंतर तो कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे ते ठरविले जाते. माञ तालुक्यातील पक्षाचे नेते मंडळी आपल्या विचाराचाच सरपंच निवडून आला पाहिजे म्हणून निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम सध्यातरी करत आहेत.
या गावांत उडणार धुराळा
मुळशी तालुक्यातील वारक, मुळशी खुर्द, माले, भांबर्डे, धामणओव्हळ, मुगाव, टेमघर, वांतुडे, भादस, बेलावडे, कोढांवळे, खुबवली, वळणे, जामगांव, डावजे, जातेडे, आंबवणे, शेडाणी, वडगाव, ताम्हिणी, संभवे, वेगरे, वांद्रे या तेवीस गावात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाचा धुराळा उडणार आहे. पाथरशेत, भोईणी, मोसे खुर्द, कोळावडे, माळेगाव, कुंभेरी, वांजळे पौड, भोडे, लव्हाडे, कोळवण, भरे, आंबेगाव, कासारअंबोली या चौदा गावामध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका होणार आहेत.