इंदापूर पोलीस ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषण
लोणी देवकर – पळसदेव (ता. इंदापूर) येथील रहिवासी सदानंद गांधले हे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इंदापूर येथील पोलीस ठाण्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते. त्यांनी गांधीगिरी पद्धतीने केलेल्या उपोषणामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि पुढील कार्यवाही सुरू झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गांधले यांची पळसदेव येथे शेतजमीन आहे. त्या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी येथील जमीन मोजमाप केलेली कागदपत्र त्यांच्या शेतात लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून कोणीतरी लंपास केली. त्याबाबत गांधले यांनी तक्रार दाखल केली होती; परंतु ती तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या गांधले यांना महिला पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावी करून तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली, असे गांधले यांचे म्हणणे होते.
त्या अनुषंगाने त्यांनी स्वातंत्रय दिनाच्या दिवशी आपण लाक्षणिक उपोषण करीत असल्याचे पत्र दिले होते. त्यावर देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर गांधले यांनी त्या दिवशी गांधीगिरी पद्धतीने उपोषण केले. त्या उपोषणाची दखल संबंधित पोलीस प्रशासनाने घेत पुढील कार्यवाही सुरू करण्यात आल्याने त्यांनी उपोषण सोडले. एकंदरीतच जर एका सुशिक्षित जेष्ठ नागरिकावर जर अशी वेळ येत असेल तर सर्व सामान्य नागरिकांच्या वाट्याला काय येत असेल याची कल्पनाच न केलेली बरी, असे ज्येष्ठ नागरिक म्हणत आहेत.