सहाजणींवर ससूनमध्ये उपचार
भोर – खोपी (ता. भोर) येथील फ्लोरा गुरुकुल इन्स्टिट्युटमधील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या 28 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील बऱ्याच मुली परप्रांतीय असून, 6 मुलींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, 22 मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी भोर रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंद साबणे यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व मुली कॉलेजच्या वसतिगृहात राहत असून, त्यातील बहुतांश विद्यार्थिनी परप्रांतीय आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था या मुली स्वतःच पाहत होत्या, अशी माहिती समोर आली आहे.
त्यांनी दोन दिवसांपूर्वी पनीरची भाजी करून खाल्ली होती. त्यानंतर त्यांना जुलाब-उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने या 28 मुलींपैकी 6 मुलींना उपचारासाठी पुणे येथील शासकीय ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
22 मुलींना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत फ्लोरा गुरुकुल इंन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकला नाही.