मुंबई – ओमायक्रॉनमुळे जागतिक पुरवठासाखळीवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे जगभरातील गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्याचबरोबर कच्च्या तेलाचे दर वाढले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी होऊन निर्देशांक वधारण्याची प्रक्रिया चालू राहिली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 477 अंकांनी वाढून 57,897 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 0.6 टक्क्यांनी म्हणजे 147 अंकांनी वाढून 17,233 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, एशियन पेंट्स, सन फार्मा, महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. दोन इंडसइंड बॅंक, पावर ग्रिड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
अमेरिका, युरोपसह आशियायी शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याचे दिसून आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदी कायम राहिली असे जिओच वित्तीय सेवा या संस्थेचे गुंतवणूक निर्देशक व्हि के विजयकुमार यांनी सांगितले. दरम्यान शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्यामुळे क्रुडची मागणी वाढून आज क्रुडचे दर 78.70 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले.
निफ्टी महत्वाच्या पातळीवर
दीनदयाळ इन्वेस्ट्मेन्ट्स या संस्थेचे विश्लेषक मनीष हाथीरमानी यांनी सांगितले की, निफ्टी 17,250 पातळी गाठून 17,233 अंकांवर बंद झाला. जर निफ्टी 17,250 अंकाच्या वर रेंगाळला तर आगामी काळात निफ्टी 17, 600 अंकांपर्यंत वाढू शकतो. निफ्टीला 16,800 अंकावर तांत्रिकदृष्ट्या भक्कम आधार असल्याचे त्यांना वाटते. ओमायक्रॉनमुळे निर्माण झालेली एकूण परिस्थिती पाहता गुंतवणूकदार शेअर बाजारावर या घडामोडीचा फारसा परिणाम होणार नाही असे समजू लागले आहेत. काही गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याच्या दृष्टीकोनातून खरेदी वाढवू शकतात असे वातावरण आहे.