मराठा आरक्षणाचे निर्णयाचे स्वागत
भोर : भोर शहरासह ग्रामीण भागातील गावागावांमध्ये मराठा समाजातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच तरुणांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करीत शासनाने जाहिर केलेल्या मराठी आरक्षण निर्णयाचे जल्लोषात स्वागत करुन सकल मराठा समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.
मराठा समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन शहरात भोर बस स्थानकापासून ते शिवतीर्थ चौपाटीपर्यंत विजयी मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मिरवणुकीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
शहरातील महिलांनी फेर धरून फुगड्या खेळत गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. तरुणांनी डीजेच्या दणदणाटात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवगर्जना देत व पोवाडे सादर करुन जल्लोष केला.
ग्रामीण भागात पारंपारिक वाद्यांचा निनाद करीत ग्रामदैवतांसमोर गुलाल उधळून छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा आदी घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी सकल मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.