मंचर – गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने प्रतीक्षेत असलेले मंचर (ता. आंबेगाव) येथील एसटी आगार शनिवारी (दि. 11) अखेर सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. एसटी आगार सुरू झाल्याने एसटीने प्रवासी व सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या 30 ते 40 वर्षांपासून मंचर येथे स्वतंत्र एसटी आगार व्हावे, अशी मागणी आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना होती. तालुक्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी राजगुरूनगर व नारायणगाव एसटी आगाराच्या बसवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे अनेकदा मंचर आणि घोडेगाव बस स्थानकावर वेळेत एसटी उपलब्ध होत नव्हत्या. यात विद्यार्थी, नागरिक, महिलांचे प्रचंड हाल होत होते.
राज्यभर प्रवास करता येणार
मंचर येथील एसटी आगार सुरू झाल्यामुळे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनींना दिलासा मिळाला असून, आदिवासी भागापासून ते पूर्व भाग व पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यभरात प्रवाशांना सुरळीत व सुरक्षित प्रवास करता येणार आहे. राज्यभर एसटीची सेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अशी माहिती एसटीचे पुणे विभाग नियंत्रक कैलास पाटील आणि आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.
13 नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने आगार सुरू
याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मंचर जवळील तांबडेमळा येथे 5 एकर जागेत 7 कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र आगार मंजूर करण्यात आले. या आगाराचे कामही आठ वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र आगारासाठी लागणारे मनुष्यबळ, साहित्य उपलब्ध होत नव्हते. याबाबतही सहकारमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आगारासाठी सर्व साहित्य, चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, संगणक प्रणाली वर्कशॉप इत्यादी बाबी उपलब्ध करून दिले असून आहे. या आगारांमध्ये मोजक्या बस उपलब्ध असून अधिकारी, कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला आहे. सोमवार (दि. 13) पासून पूर्ण क्षमतेने मंचर एस टी आगार सुरू होणार आहे.
उद्घाटन टाळून आगार सुरू करण्याचे आदेश
1990 साली प्रथमच आमदारकीसाठी उभे राहिलेले दिलीप वळसे पाटील यांनी तालुक्यातील विकासकामा संदर्भात वचननामा जारी करून एसटी आगार उभारले जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर मंचर किवा घोडेगाव येथे एसटी आगार उभारणीसाठी असणाऱ्या जागेसंदर्भात चाचपणी केली.
आठ वर्षापूर्वी मंचरजवळील तांबडेमळा येथे आगार उभारणी संदर्भात कार्यवाही होऊन आगाराचे काम पूर्ण झाले. राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण असलेला प्रश्न मानून एसटी आगाराचे उद्घाटन न करता सहकारमंत्री वळसे पाटील यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी शनिवारी (दि. 11) आगार सुरु करण्याचे आदेश एसटी अधिकाऱ्यांना दिले.