जुन्नर -सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल अनेकदा चर्चा होत असतात; परंतु याच सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी करत जुन्नर तालुक्यातील युवकांनी एकत्र येत “एक मराठा लाख मराठा’ ग्रुपच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातीलच नव्हे; तर पुणे जिल्ह्यातील तसेच मुंबई मधील करोनाबाधित रुग्णांना बेड, इंजेक्शन उपलब्ध करून देऊन उपचारासाठी मदत केली आहे.
प्रवेश देवकर, शिवम घोलप, शिनू गटकळ, विक्रांत खैरे, अमित दुराफे हे युवक व त्यांचे सहकारी स्वतः झोकून देऊन प्रामाणिकपणे करत असलेल्या मदतीमुळे अनेक करोनाबाधित रुग्णांवर वेळेत उपचार होण्यास मदत झाली आहे. रुग्णांनी दूरध्वनीद्वारे अथवा मेसेज द्वारे संपर्क साधल्यानंतर हे युवक तात्काळ अवघ्या काही तासातच आवश्यक ती मदत मिळवून देतात.
एक मराठा लाख मराठा या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत 375 पेक्षा जास्त इंजेक्शन, 148 पेक्षा अधिक प्लाझ्मा आणि 97 पेक्षा जास्त रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले आहेत. काही दिवसांपूर्वी प्लाझ्मा डोनेशन कॅम्पमधून 41 युनिट प्लाझ्मा संकलित करण्यात येऊन जुन्नर तालुक्यातील 19 तर इतर तालुक्यातील 7 जणांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात आला.