राजगुरूनगर/वाफगाव – खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. माघारीच्या अंतिम टप्प्यात म्हणजे मंगळवारी (दि. 23) पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेत आता राजकीय हस्तक्षेप झाल्याची तालुकाभर चर्चा होत आहे.
खेड तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या प्रबळ संघटना आहेत. त्यात शिक्षक संघ, पदवीधर प्राथमिक व केंद्रप्रमुख, शिक्षक समिती, क्रास्टाईब, अखिल भारतीय शिक्षक, जुनी पेन्शन, एकल, शिक्षक भारती, आदिवासी उन्नती आदी संघटनांचा समावेश आहे. संस्थेची 144 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. संस्थेचे भागभांडवल 25 कोटी रूपये व 1368 सभासद आहेत.
खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील 19 जागांपैकी 15 जागेवर प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. तर सर्वसाधारण प्रवर्गातील 4 गटांतील जागांसाठी 9 शिक्षकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा पेच निर्माण झाला होता. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिक्षक संघटनांमध्ये समेट घडवून आणला आणि चर्चेतून नाराजांची नाराजी दूर केली. तसेच या संघटनेतील पदाधिकार्यांनी आपापल्या समर्थक इच्छुकांची मनधरणी केली. त्यामुळे तब्बल 91 वर्षांच्या इतिहासात असलेल्या या संस्थेत पहिल्यांदा बिनविरोध निवडणूक पार पडली.
शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पॅनल प्रमुख विट्ठल तांबे, शांताराम नेहरे, दिनेश ठाकूर, संजय राळे, सचिन गावडे, दत्तात्रेय शिनगारे, संतोष कुंभार, सुरेश आदक, अनिल तळपे, सुनील वाघ, जालिंदर दिघे, अविनाश शिंदे आदींनी निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. सहायक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी कामकाज पाहिले. राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, संचालक राजेंद्र सांडभोर यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले.
आमदार मोहितेंची मध्यस्ती यशस्वी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदरच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घरी चर्चा करीत सर्व संघटनांनी आपले उमेदवार प्रतिनिधी घोषित केले.अडीच वर्षांसाठी संधी, त्यानंतर राजीनामा व उर्वरित काळात संघटनेने सुचविलेल्या दुसर्या इच्छुकाला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले असून हे सर्व आमदार मोहिते पाटील यांच्या समक्ष घडले असल्याचे बोलले जात आहे.
बिनविरोध संचालक
शांताराम नेहरे, संदीप जाधव, सुनिल वाघ, सुलभा शिवले, तृष्णा घुमटकर, अशोक सावंत, तुकाराम शिंदे, तानाजी महाळुंगकर, सुरेश आदक, दिनेश ठाकुर, संदीप ढेरंगे, श्रीराम कान्हूरकर, ज्ञानेश्वर मोकाशी, तुकाराम वाटेकर, विवेकानंद गायकवाड, नवनाथ ढोकले, रामचंद्र शिंगाडे, गणेश दरवडे, साहिल शिकीलकर.