कुंभारवळण (ता. पुरंदर) : येथील बाल आनंद मेळाव्यात बोलताना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद.
बेलसर – अनाथांची माई जेष्ठ समाज सेविका पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी समाजामध्ये संवेदनशीलता जागृत करण्याचे कार्य केले आहे. अनाथ लेकरांसाठी त्या ममातारूपी मायेचा आणि प्रेमाचा सागर होत्या. त्यांनी गोर गरीब अनाथ निराधार, निराश्रित लेकरांना जीवनदान देण्याचे कार्य केले. त्यांनी सुरू केलेले हे पावन कार्य थांबू देऊ नका, असे प्रतिपादन भारताचे माजी राष्ट्रपती (14वे) रामनाथ कोविंद यांनी केले.
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण(ता.पुरंदर) येथील अनाथ आश्रमात आयोजित बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते थाटात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाल मेळाव्याचे आयोजक दीपक गायकवाड,सन्मती बाल निकेतनच्या ममता सपकाळ, सावित्रीबाई फुले वसतिगृहाचे अरूण सपकाळ, आमदार संजय जगताप, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे रोहित शिंदे तसेच तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, माझा दोनवेळा माईंशी संबंध आला. 2017 मध्ये नारी शक्ती आणि 2021 मध्ये पद्मश्री असे दोन सर्वोच्च पुरस्कार देऊन मी त्यांच्या कार्याचा गौरव केला ही माझ्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. माईंनी मला दोन वेळा माझ्या संस्थेला भेट द्या अशी विनंती केली होती. परंतु राष्ट्रपती पदावर काम करीत असतांना राजशिष्टाचारमुळे अनेक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. जायचे असेल तर अनेक अडचणी येतात. त्याचा सामान्य लोकांना त्रास होतो याची जाणीव मला होती. तेव्हा त्यावेळी माईंच्या संस्थेला भेट देणे मला शक्य झाले नाही.
परंतु आपण आयोजित केलेल्या या बाल मेळाव्यात माईंच्या सर्व संस्थेतील मुला-मुलींना भेटण्याचा योग आला. माझ्या समोर बसलेल्या चिमुकल्यांना बघून मला आनंद होतो आहे, अशी कबुली त्यांनी दिली. बाल आनंद मेळाव्याचे प्रास्ताविक अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी व मिनल सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने झाली.
राष्ट्रपती होण्याचे स्वप्न बघा
माझ्यासमोर बसलेल्या चिमुकल्यांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठे होण्यासाठी स्वप्न बघायचे असेल तर राष्ट्रपती होण्याचे स्वप्न बघितले पाहिजे. त्याच कारण की राष्ट्रपती हे शेवटचे पद आहे, या पदाच्या पुढे दुसरे कुठलेही पद मोठे नाही. माणसाचे स्वप्न कधीच संपत नाहीत. तुम्ही अशी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा, प्रेरणेसाठी माझा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहील, चिंता करू नका, असे म्हणत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.