आंबेगाव तालुक्यात वरातींच्या मिरवणुकीमुळे नागरिक त्रस्त
आवाजाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन
डीजे चालकांवर कारवाईची मागणी वाढली
रवींद्र वाळके
अवसरी – आंबेगाव तालुक्यात लग्नसराई धुमधडाका जोरात सुरू आहे. मात्र, या लग्नसराईमध्ये वरातींच्या मिरवणुकीमध्ये आणि इतरवेळीही मोठ्या आवाजात डीजेचा वापर होत असून, डोळ्यांना त्रास होईल, अशी रंगीत लाईट वापरली जात असल्याने नागरिकांसह वऱ्हाडी मंडळीही त्रास होत आहेत. न्यायलयाने ठरवून दिलेल्या आवाजापेक्षा जास्त आवाज ठेवणाऱ्या डीजे चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहे.
आंबेगाव तालुक्यात लग्नकार्यांमध्ये डीजेचा वापर प्रमाणाबाहेर वाढला आहे. साखरपुडा, लग्न मुहुर्तासह वरातींच्या मिरवणुकांत कर्णकर्कश्श आवाजात डीजे लावले जात आहेत. साऊंड सिस्टिम, हॅंगिंग डीजेचा मुक्त वापर केला जात असून, प्रदूषण मंडळासह न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाचे सर्रास उल्लंघन होत आहे. ध्वनी प्रदूषण कायद्याच्या नियमाप्रमाणे क्षमतेपेक्षा अधिक आवाज ठेवून डीजे वाजवले जात असल्याने वातावरणात त्याचे व्हायब्रेशन जाणवत आहे. यामुळे लहान मुले, आजारी व्यक्ती, हृदयविकाराचे रुग्ण, हॉस्पिटल, शाळा, पतसंस्था अशा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
आंबेगाव तालुक्यात पेठ, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, अवसरी फाटा, मंचर, घोडेगाव, निरगुडसर फाटा, पारगाव, चांडोली रोड, कार फाटा, शिंगवे आदी गावांत आलिशान मंगल कार्यालय, लॉन्स उभारले आहेत. ग्रामीण भागातील मुला-मुलींचे विवाह या मंगल कार्यालयात पार पडतात. डीजे किंवा हॅंगिंग डीजे साऊंड सिस्टिम लावून भव्य मिरवणूक काढली जात आहे. रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर चालणाऱ्या या मिरवणुकींना आणि वरातीला बंदी घालावी. न्यायालयाने ठरवून दिलेल्या डीजेच्या आवाजाचे उल्लंघन करणाऱ्या डीजे मालकांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ, विशेषता महिलावर्ग करीत आहे.
जे डीजे साऊंड सिस्टिम चालक-मालक न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाचे नियम मोडतील अशा डीजे गाड्यांचे क्रमांक 02133 -223159 या दूरध्वनी क्रमांकावर कळवावेत, संबंधितांवर त्वरीत कारवाई केली जाईल. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या वरातींवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
– सतीश होडगर, पोलीस निरीक्षक, मंचर