पुणे – आघाडीवर मी… असे म्हणत गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय लष्कराच्या तीनही दलाच्या जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवून आपल्या सीमांचे रक्षण केले आहे. त्या गौरवशाली परंपरेत सहभागी होऊन देशाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची 144 वी जवानांची तुकडी उत्तीर्ण बाहेर पडली.भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना ही मोठी अभिमानाची घटना म्हणावी लागेल. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत खडकवासला येथील “एनडीए’मधील खेत्रपाल परेड ग्राऊंडमध्ये या तुकडीचे दीक्षांत संचलन मंगळवारी पार पडले.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी ही देशातील प्रमुख संयुक्त सेवा प्रशिक्षण संस्था आहे जी “लष्करी नेतृत्वाचे उगमस्थान’ आहे. स्वातंत्र्याबरोबरच “एनडीए’च्या स्थापनेचेही हे 75 वे वर्ष असून, या वर्षांत 144 वी तुकडी उत्तीर्ण होऊन पुढच्या प्रशिक्षणासाठी बाहेर पडली. 144 व्या तुकडीचा अभ्यासक्रम जून 2020 मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि आज तीन वर्षांचे कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅडेट्स एका औपचारिक कार्यक्रमात उत्तीर्ण झाले.
झालेल्या पासिंग आऊट परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या जनरल अनिल चौहान यांनी परेडचा आढावा घेतला. या परेडमध्ये एकूण एक हजार 175 कॅडेट्स सहभागी झाले होते त्यापैकी 356 कॅडेट्स पासिंग आऊट कोर्सचे होते. यामध्ये 214 आर्मी कॅडेट्स, 36 नेव्हल कॅडेट्स आणि 106 एअर फोर्स कॅडेट्ससह 19 मित्र परदेशी देशांतील म्हणजेच भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश येथील कॅडेट्सचा समावेश होता. त्यानंतर कॅडेट त्यांच्या संबंधित प्री-कमिशनिंग ट्रेनिंग अकादमीमध्ये सहभागी होतील.
आफ्रिद अफरोजने एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम राहिल्याबद्दल राष्ट्रपती सुवर्णपदक जिंकले. अंशू कुमार यांनी एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहिल्याबद्दल राष्ट्रपतींचे रौप्य पदक जिंकले आणि प्रवीण सिंगने गुणवत्तेच्या एकूण क्रमानुसार तिसऱ्या स्थानावर राहिल्याबद्दल राष्ट्रपतींचे कांस्य पदक जिंकले. परेड दरम्यान सादर करण्यात आलेल्या “चॅम्पियन स्क्वॉड्रन’ म्हणून “रोमियो स्क्वॉड्रन’ला प्रतिष्ठित “चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ मिळाला. परेड नंतर लोहगाव एअरबेसवरून आकाशात झेपावलेल्या सुखोई विमानांनीही “एनडीए’मध्ये “गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
सर्व पुरस्कारप्राप्त कॅडेट्सचे जनरल चौहान यांनी अभिनंदन केले, तसेच ज्या पालकांनी अभिमानाने आपल्या पाल्याला सशस्त्र दलात सामील होण्यासाठी पाठवले त्या पालकांचे चौहान यांनी आभार मानले. सेवेत पुढे जाताना एकत्रित वावरण्याची भावना पुढे नेण्याचा कानमंत्र दिला.