वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
पिरंगुट : मुळशी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व भागापेक्षा पश्चिम भागात संततधार अधिक आहे. वर्षाविहारासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी होत असून भुगाव ते ताम्हिणी घाट दरम्यान असलेली सर्व हॉंटेल आलेल्या पर्यटकांच्या गर्दीने फुल्ल होत आहे. तर रस्त्याच्या कडेला कणीस विक्री करणाऱ्या विक्रेत्याचाही चांगला व्यवसाय झाला.
पुणे शहरापासून जवळच असलेल्या मुळशी तालुक्याला पर्यटक नेहमी पसंती देत असतात. लवासा, मुळशी धरण, कोळवण खोरे भागात दिवसभर गेलेल्या पर्यटकांमुळे सायंकाळी परतीच्या वेळी पौड, घोटावडे फाटा, पिरंगुट आणि भुगांव येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पौड येथे पौड बसस्थानक ते हॉटेल गौरीपर्यंत तीन किलोमीटर पेक्षा जास्त वाहनांची रांग लागलेली होती.
घोटावडेफाटा येथे लवासा रोड व पौड रोडकडे पुण्याकडे जाण्यासाठी गर्दी झाली होती; मात्र घोटावडेफाटा येथे खड्डे बुजविल्याने व पोलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती.
पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनायक देवकर, रमेश गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंभार, संतोष दावलकर, राजेश गायकवाड, नितीन गार्डी, सतीश जाधव, अनिता रवळेकर, इतर पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करत आहे.