पिंपरी – इमारतीच्या पायाचे खोदकाम करताना सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे रस्ता खचल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला पिंपरी-चिंचवड महापालिकेने नोटीस बजाविली आहे. रस्त्याचे संपूर्ण दुरुस्तीचे काम होईपर्यंत बांधकाम परवानगीस स्थगितीची नोटीस शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरु आहे. इमारतीसाठी खोल खड्डा खदण्यात आला आहे. त्याच्या चारही बाजुंनी पायलिंग केले. मात्र, ते निकृष्ट दर्जाचे असल्याने महापालिकेचा 15 फूट रस्ता खचला. घटना सकाळी घडल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. महापालिकेची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे पिंपळे सौदागरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. तसेच महापालिकेने बांधकाम व्यावसायिकाकडून जलवाहिनी आणि रस्ता दुरुस्तीचा खर्च घेतला आहे.
महापालिकेने बांधकाम व्यावसायिक घनश्याम सुखवानी, संजय रामचंदानी यांना नोटीस बजाविली आहे. पायाचे खोदकाम करताना जमीन लेवलपर्यंत पाइल पद्धतीने केलेली 50 ते 60 मीटर लांबीची संरक्षक भिंत ढासळून रस्ता खचला. त्यामुळे पाण्याची 300 व्यासाची जलवाहिनी, स्टॉर्म वॉटर वाहिनी, ड्रेनेज लाईन, वीजवाहिनी तुटली आहे. यामुळे लोकांच्या संरक्षणास बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम तत्काळ बंद करावे.
नकाशाप्रमाणे सीमाभिंत बांधवी. स्ट्रॉम वॉटर वाहिनी, पाण्याची जलवाहिनी, इतर सेवावाहिन्या दुरुस्त करुन रस्ता पूर्ववत वाहतुकीस उपलब्ध करुन द्यावा. सुरक्षाकडे बसवून हे काम करावे. रात्रीच्या वेळेस अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. जीवित, वित्तहानी झाल्यास विकसक म्हणून सर्वस्वी जबाबदारी राहील. काम पूर्ण केल्याचा लेखी अहवाल महापालिकेला द्यावा. काम पूर्ण होईपर्यंत बांधकाम परवानगीस स्थगिती देण्यात आल्याचे महापालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.