पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित

पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) या पदासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपदाचा बहुमान कोणत्या महिला सदस्याला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर हा बहुमान आपल्याला मिळावा यासाठी इच्छुकांकडून हालचालींना सुरवात झाली असून, वरिष्ठ नेत्यांना संपर्क साधणे, त्यांच्या भेटी घेण्यास आता सुरवात होणार आहे.

राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण आज (दि. 19) जाहीर झाले. त्यामध्ये पुणे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दि. 20 जानेवारी 2020 ला सध्याच्या अध्यक्षपदाची मुदत संपणार आहे. त्यामुळे याच दिवशी नवीन महिला अध्यक्ष निवडले जाणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेमध्ये मागील 27 वर्षात अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत होते. त्यामुळे यंदाचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित होणार, याबाबत दैनिक प्रभातकडून शक्‍यता वर्तविण्यात आली. त्यानुसार मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात मुख्य सचिव अजय मेहता यांच्या उपस्थितीत चक्राकार पध्दतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.

पुणे जिल्हा परिषदेत एकूण 16 महिला सर्वसाधारण वर्गामध्ये आहेत. त्यामध्ये तुलसी भोर, अरूणा थोरात, स्वाती पांचूंदकर, सविता बगाटे, सुजाता पवार, शोभा कदम, कल्पना जगताप, अर्चना कामठे, पुजा पारगे, अनिता इंगळे, राणी शेळके, रोहीणी तावरे, मिनाक्षी तावरे या इच्छुकांच्या यादीमध्ये आहेत. त्यामुळे यापैकी एका महिला सदस्येला अध्यक्षपदाचा बहुमान मिळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here