चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता सूर्याचा अभ्यास

डॉ. अनिल भारद्वाज : “अदित्य एल-1′ अवकाश मोहीम पुढील वर्षापासून

पुणे – चांद्रयान-2 नंतर आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी “अदित्य एल-1′ ही अवकाश मोहीम पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदाबाद येथील केंद्र शासनाच्या भौतिक अनुसंधान प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांनी रविवारी दिली.

पाषाण येथील द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरोलॉजीच्या (आयआयटीएम) 58 व्या स्थापना दिनानिमित्त डॉ. भारद्वाज यांचे “भारताची ग्रह मोहीम : विज्ञान आणि आव्हान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. शेखर मांडे, आयआयटीएमचे संचालक प्रो. रवी नानजुंदिया उपस्थित होते.

“सूर्य हा अत्यंत प्रभावी आणि प्रखर तारा आहे. त्याचा अभ्यास आतापर्यंत कोणीही केलेला नाही. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम राबवणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याशिवाय ग्रह मालिकेत अनेक ग्रह आहेत. त्यांचाही अभ्यास तितकाच महत्त्वाचा आणि रंजक आहे. त्यात ऍटलास आणि शुक्र या ग्रहांचा अभ्यास करण्याच्या हेतूने राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे नियोजन सुरू आहे. 2023 पर्यंत त्याचेही नियोजन पूर्ण होईल,’ असेही डॉ. भारद्वाज यावेळी म्हणाले.

आयआयटीएममधील हवामान आणि हवामान संशोधनासंदर्भात गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा संचालक डॉ. रवी यांनी घेतला. ते म्हणाले, “हवेतील प्रदूषणाचा अंदाज लावण्यासाठी संस्थेने दिल्लीसाठी “एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ विकसित केली आहे. 400 मीटर उंचीवरील हवेच्या गुणवत्तेचा अचूक अंदाज वर्तवणे या प्रणालीमुळे शक्‍य होणार आहे. सध्या हवामानाचा अंदाज हा आगामी 5 दिवसांपर्यंतचा दिला जातो, पण तो विभागीयस्तरावर असतो.

तो आणखी सूक्ष्म व्हावा, यासाठी छोट्या-छोट्या भागांचासुद्धा अंदाज वर्तविण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी भोपाळ येथे जमीन घेण्यात आली असून तेथे ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. मध्य भारतातील मान्सूनच्या वर्तनाचा अभ्यास लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठी फायदा होणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. शेखर मांडे यांचेही भाषण झाले. वर्षभरात आयआयटीएममध्ये उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.