आळंदी-तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये एकही व्यक्ती करोना लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, सामान्य नागरिकांना या लसीचा भुर्दंड पडू नये म्हणून आळंदी नगरपरिषद प्राप्त यात्रा कर अनुदानाच्या रकमेवर जमा झालेल्या व्याजाच्या रकमेतून सर्व सामान्य आळंदीकरांना कोविशिल्ड व को-वॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आळंदी नगरपरिषद यात्रा समिती सभापती गिलबिले यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना यात्रा समिती सभापती सचिन गिलबिले यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, संपूर्ण जगावर करोना विषाणूचे सावट आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात शेकडो जीव घेतले आहे, या घातक आजारातून बरे व्हावे म्हणून शास्त्रज्ञांनी करोना प्रतिबंधक लस तयार केली आहे, गेल्या काही दिवसांपासून ही लस नागरिकांना दिली जात आहे.
पहिल्या टप्प्यात ही लस करोना योद्ध्यांना मोफत देण्यात आली आहे, दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्याची तयारीही प्रशासकीय स्तरावर झाली आहे. त्याअनुषंगाने आळंदी नगरपरिषदेकडून सर्वसामान्य नागरिकांना करोना लस मोफत देण्याची गरज आहे. करोना आजाराला कायमचा प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येकाला लस टोचणे महत्त्वाचे आहे.