बेट भागात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती माळवाडी, म्हसे, शरदवाडीत मोर्चेबांधणी
अरुणकुमार मोटे
सविंदणे – शिरूर तालुक्यात टाकळी हाजी व जांबूत येथील ग्रामपंचायतचे विभाजन होऊन नव्याने माळवाडी, म्हसे, शरदवाडी, अशी तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. टाकळी हाजी व जांबूत येथील सदस्यांचा कालावधी संपल्याने अडीच वर्षे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले होते. या भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.
राष्ट्रवादीतील माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याविरुद्ध माजी सरपंच दामुशेठ घोडे यांच्या दोन गटात सरपंच पदासाठी मोठा संघर्ष होऊन जोरदार लढत आहे. या दोघांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. परंतू दोघांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने त्यांची एकमेकांविरोधात जोरदार टिकाटिप्पणी सुरू आहे. ते एकमेकांच्या कार्यक्रमातही हजर राहत नाही. इतका संघर्ष टोकाला गेला आहे.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांनी (दि.8) जुलै रोजी दोघांचीही टाकळी हाजी येथे पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली आहे. त्यांची एकमेकांविषयीची गाऱ्हाणी ऐकली आहेत. राष्ट्रवादीतील खदखद उफाळून बाहेर येऊ यासाठी माजी मंत्री वळसे पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, गावपातळीवरील अस्तित्व राखण्यात वळसे पाटील हे यशस्वी होतात का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नागरिकांकडून निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त होत आहेत. तरी नव्याने गुढग्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रणांगणात तयार असलेल्या राजकारणात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढल्याने असे काही घडेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. दोघांच्या भांडणात उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांकडून तिसरी आघाडीही तयार होणार असल्याची चर्चा आहे.
गावडे-घोडे समर्थक एकमेकांना भिडणार?
माजी आमदार पोपटराव गावडे व माजी सरपंच दामुशेठ घोडे यांचे समर्थक एकमेकांना भिडण्याची तयारी करून निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. तरुणाई राजकारणासाठी सज्ज झाल्याने बिनविरोध निवडणुकीसाठी समझोता होईल की जाणकार आणि नवोदित असे दोन गट तयार होतील, हे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. एकंदरीत परिस्थिती पाहता दोन्हीही गटाकडून पूर्वतयारी सुरू झाली असून ग्रामपंचायतीच्या निकालावर पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीची रणनीती ठरणार असल्याने बडे नेते ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाणार आहे.