नारायणगाव – जुन्नर तालुक्यात बोगस बियाणांची विक्री होत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवनेरी ऍग्रिकल्चर डीलर्स असोसिएशनने पंचायत समिती जुन्नरचे बियाणे निरीक्षक निलेश बुधवंत, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, आमदार अतुल बेनके यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजित वाजगे, राजू वामन, महेश घुले, मयूर घुले, हनुमंत पवार, सागर पाटे, रमेश वायकर, मच्छिंद्र भोर व कृषी विक्रेते उपस्थित होते. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची पेरणी व मशागतीच्या कामांची धावपळ चालू आहे. याचाच फायदा घेऊन बाहेरील फेरीवाले अनाधिकृत विनापरवाना बनावट बियाणे, खते व औषधांचे पॅकिंग करून विक्री करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे अधिकृत कृषी मालाची विक्री करणाऱ्या दुकानदारांची बदनामी होत आहे. तरी तालुका कृषी अधिकारी यांनी अनधिकृत विनापरवाना बियाणे, खते, औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर बंदी घालून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यापुढील काळात बनावट बियाणे, खते, औषधे अनाधिकृत विनापरवाना विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबतीत बियाणे, खते व औषधे निरीक्षक नीलेश बुधवंत व तालुका कृषी अधिकारी योग्य ती खबरदारी घेतील.
-सतीश शिरसाठ, कृषी अधिकारी जुन्नर
शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत शासनमान्य परवानाधारक कृषी केंद्रावर बियाणे, खते व औषधांची खरेदी करावी. जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही. अनोळखी ठिकाणाहून कृषी मालाची खरेदी करू नये.
-अजित वाजगे, शिवनेरी ऍग्रिकल्चर डीलर्स असोसिएशन