शिक्रापूर – शिक्रापूर ता. शिरुर येथे मनोज जरांगे यांच्यासह मराठा आरक्षणाला पाठींबा देत नुकतेच मराठा समाजाने मुख्य चौकात आजपासून साखळी उपोषण सुरु केले असून नुकतेच गावामध्ये राजकीय कार्यक्रम बंदी सह राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना मनोज जरांगे यांच्यासह मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून शिक्रापूर येथे सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने आज रविवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळ पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असताना यामध्ये अनेक महिलांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे, तर या उपोषणाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये राजकीय कार्यक्रम बंदी तसेच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असा निर्णय घेत एक मराठा – लाख मराठा, कर्म मराठा – धर्म मराठा, मराठा आरक्षण न देणाऱ्या निर्दयी सरकारचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक लावत सकल मराठा समाजाने त्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे तर शिक्रापूर येथे सुरु करण्यात आलेल्या
बेमुदत साखळी उपोषणामध्ये परिसरातील जातेगाव बुद्रुक – जातेगाव खुर्द, मुखई, धामारी – खैरेनगर, हिवरे – पिंपळे धुमाळ, पिंपळे जगताप, करंदी, केंदूर, सणसवाडी, वाजेवाडी – मांजरेवाडी, बुरुंजवाडी हि गावे क्रमवारी दररोज येथील साखळी उपोषण मध्ये आपला सहभाग नोंदवणार असून लवकर मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार आंदोलांची व्याप्ती वाढण्यात येणार असल्याचे देखील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.