पुणे – राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणार आहे. सोमवारी (दि.30) मुंबई येथील न्यायालयाने ललितची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ललितला अटक करण्याची कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट मिळविले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट दिला असून ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात येणार आहे.
ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटींच्या मॅफेड्रॉन या अंमली पदार्थांसह ललित पाटीलच्या 2 साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने 1 ऑक्टोबर रोजी अटक केली. ललित पाटील हा रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवित होता. पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा रुग्णालयातून पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्याला पळून जाण्यास त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, त्याची मैत्रिण प्रज्ञा कांबळे, रोझरी स्कूलचा विनय अऱ्हाना, त्याचा चालक दत्ता डोके यांनी मदत केली होती. पुढे या प्रकरणात भूषण पाटील व अभिषेक बलकवडेला नेपाळ बॉर्डरवरून अटक झाली.
त्याच वेळी दुसरीकडे ललित मुंबईच्या साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई तसेच इतर ठिकाणच्या धागेदोरे धुंडाळले. सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा ताबा घेण्यास पुणे पोलिसांना कायदेशीर परवानगी मिळाली आहे. त्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊन अटक होण्याची शक्यता आहे. याचबरोबर शिवाजी शिंदे, राहुल पंडित या आरोपींचा ताबा मिळावा म्हणून अर्ज केला आहे.