ए. टी. माने
दिवे – पुणे शहराला खेटून असलेल्या दिवे घाटाच्या माथ्यावर झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील व्ही. के. हॉटेलवर छापा टाकून कॅसिनोचा गाशा गुंडाळला आहे. या कारवाईने पुरंदर तालुक्यात या जुगाराचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात उच्चभ्रू, धनाढ्यांचा वावर आहे. तसेच पुरंदर तालुक्यातील सधन कुटुंबातील तरूण याला बळी पडल्याचे दिसत आहे.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक तालुका म्हणून पुरंदर तालुक्याची ओळख आहे. याच भूमित अध्यात्माची ज्योत तेवत आहे. दरवर्षी दिवे घाटांतून पांडुरंगाच्या ओढीने लाखों वैष्णव भक्तीरसात तल्लीन होऊन मार्गस्थ होतात.
याच भूमितील शेतकरी, व्यापारी, उद्योजक कष्टातून जीवनाचं सोनं करतात. अंजीर उत्पादक टापू असलेले हे गाव जेमतेम 2 ते 3 हजार लोकसंख्येचे आहे. कष्टाळू शेतकरी आणि अध्यात्माची वहिवाट असलेल्या याच परिसरात वारकरी सांप्रदायाचा पताका फडकत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावाशेजारीच घाट माथ्यावर अवैध व्यवसायाचे दालन उघडले आहे.
गेल्या चार वर्षांत विजय कोल्हापुरे नामक पुत्र याच वारकरी सांप्रदायाच्या वाटेवर कॅसिनोचा बाजार मांडून तरूण पिढीला बरबादीच्या वाटेवर नेत आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून हे हॉटेल थाटले आहे. पहिल्यांदा हे हॉटेल सुरू केल्यानंतर प्रथमदर्शनी मध्यम आणि पुणे शहरातील धाटणीचे होते.
मात्र, त्यानंतर कोल्हापुरे यांनी दोन वर्षांत पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत कॅसिनोचा बाजार मांडला. पुण्यालगत असल्याने शहरातील तसेच देशभरातून आलेले उच्चभ्रू लोकांनी हा बाजार उभारीला नेला. तत्कालीन आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुण्यातील अवैध व्यवसायाच्या मुसक्या आवळल्यानंतर शौकीन इतर पर्यायाच्या शोधात होते. ही संधी साधत कोल्हापुरे यांनी व्यवसायात “बरकत’ आणली.
हॉटेलभोवती नेहमी अलिशान गाड्या दिसत होत्या. मात्र, स्थानिकांना याची पुसटशी कल्पना आली नव्हती. गर्भश्रीमंतांची ओळख असलेला हा खेळ पुरंदर तालुक्याला बघता बघता कवेत घेतला. या हॉटेलमध्ये जुगाऱ्यांज बिडदास्त ठेवली होती. यात ते दिवसरात्र मश्गूल होऊन जात होते.
कोटींच्या घरात उलाढाल, पोलीस अनभिज्ञ
झेंडेवाडीतील हॉटेलवर छापा टाकल्यानंतर प्रथमदर्शनी 30 लाखांची रोकड हाती लागली आहे. त्यामुळे दिवसाकाठी या जुगारात किमान पाऊणकोटींची उलाढाल होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातील धनदांडग्यांचा वावर डोळे दीपावणारा आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गातील तरूण पिढी भरडली जात आहे. इंग्लड, युरोप देशातील हा खेळ गोवा राज्यात रूजला आहे. आता हाच खेळ देशातील आठव्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुणे शहरात सुरू झाला आहे. इतके वर्षे सासवड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या कारवाईनंतर झारीतील “शुक्राचार्य’ शोधून काढण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा अवैध व्यवसायावर हातोडा हाणला आहे.
पुरंदरमधील प्रगतशील शेतकऱ्यांची मुले
पुरंदरच्या प्रवेशाद्वारावर मांडलेल्या या खेळात तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांची मुले भरकटली आहेत. ही पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना त्यांच्या कुटुंबांना भानच राहिले नाही. पोलीस कारवाईत तालुक्यातील तरूण सापडले आहेत. यावरून पुरंदरला विळखा पडला आहे. हे यातून स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी एटीएसच्या पथकाने दिवे परिसरात छापा टाकून बोगस कंपनी उघडकीस आणली होती. त्यातून लाखो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. त्यामुळे दिवे, झेंडेवाडी परिसर गुन्हेगारीच्या विळख्यात गेल्याची चिन्हे दिसत आहेत.
परराज्यातील धनिकांचा सहभाग चक्रावणारा
अटकेतील जुगाऱ्यांमध्ये परराज्यातील उद्योजक, व्यापारी, गर्भश्रीमंताचा सहभाग चक्रावणारा ठरला आहे. पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांसह जिल्ह्यातील हवेली, इंदापूर तालुक्याला बाधा पोहोचली आहे. तसेच मुंबई, सातारा येथील जुगारी ठाण मांडून असतात. कॅसिनोच्या माध्यमातून पुणे शहरातील शौकीनांना घाट माथ्यावर रम्य परिसरात विसावा, मद्याच्या सहवासात विलासी जीवन जगण्याचा “राजमार्ग’ सापडला आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी- चिंचवड शहरातून अनेक जुगारी व्ही. के. हॉटेलची पायधूळ झाडत होते. त्यामुळे या कारवाईने व्हीकेच्या ग्राहकांची पाळेमुळे देशभरात पसरली आहेत.