कोरेगाव भीमा येथील घटना
कोरेगाव भीमा/ शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील पुलाच्या वळणाचा अंदाज न आल्याने रात्री तीन वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार रस्त्याचे खाली कोसळून पन्नास फूट कोसळली. यात दोघे युवक गंभीर जखमी झाले असून एक युवक किरकोळ जखमी झाला आहे.
एकांश सिंघल (वय 30), ऋषिकेश यादव (वय 34, दोघे रा. वाघोली, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले असून राजा विनायक सिंघ (वय 39, रा. वाघोली हा युवक किरकोळ जखमी झाला आहे.
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीच्या पुलावरून स्विफ्ट कारमधून एंकेश सिंघल, राजा सिंघ व ऋषिकेश यादव हे तिघे युवक दि. 16 रोजी पहाटे तीनच्या सुमारास पुणे बाजूने अहमदनगर दिशेने चाललेले होते. कोरेगाव भीमातील भीमा नदीच्या पुलावरून पुढे आल्यानंतर असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची कार पुलाच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळून पलटी झाली. यात तब्बल पन्नास फूट लांब कोसळत गेली. दरम्यान, तिघे युवक कारमध्ये अडकले गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शंकर साळुंके, पोलीस नाईक राकेश मळेकर, प्रफुल्ल सुतार, पोलीस मित्र खंडू चकोर, प्रवीण कोल्हे, मयूर भंडारे यांसह आदी युवकांनी याठिकाणी धाव घेतली. एका युवकाची मान कारच्या काचेमध्ये अडकलेली असल्याचे दिसून आले. यावेळी कारच्या काचा फोडून तिघा युवकांना बाहेर काढले. त्यांच्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रफुल्ल कल्याण सुतार खबर दिली आहे. कार चालक एकांश सिंघल याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास राकेश मळेकर हे करीत आहेत.