पुणे – अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये चेन्नई लायन्स आणि यू मुंबा टीटी यांच्यातली लढत चुरशीची झाली. भारताची युवा खेळाडू दिया चितळने महिला एकेरीच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई लायन्सच्या यांग्झी लियूविरुद्ध एक गेम जिंकून यू मुंबाचा 8-7 असा विजय पक्का केला. लियूने ही लढत 11-6, 8-11, 11-3 अशी जिंकली. परंतु यू मुंबाला पराभूत करण्यासाठी दियाविरुद्धचे तिन्ही गेम जिंकणे चेन्नईसाठी महत्त्वाचे होते. दियाने एक गेम जिंकून गतविजेत्या चेन्नई लायन्सचा पराभव पक्का केला.
दरम्यान, आधीच्या सामन्यांत क्वाद्री अरुणाने शरत कमलवर 3-0 असा सहज विजय मिळवून यू मुंबाला आघाडी दिली. अरुणाने पहिला गेम 11-8 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये त्याने आक्रमक खेळ करताना 11-8 अशी बाजी मारली आणि शेवटचा गेमही 11-5 असा सहज जिंकला. महिला एकेरीत लिली झॅंगने 2-1 अशा फरकाने सुतिर्था मुखर्जीवर विजय मिळवून यू मुंबाची आघाडी 5-1 अशी मजबूत केली. झॅंगने पहिला गेम 11-10 असा जिंकला. झॅंगने दुसऱ्या गेममध्येही 11-7 अशी बाजी मारली, परंतु सुतिर्थाने तिसरा गेम 11-10 असा जिंकला.
मिश्र दुहेरीत मानव ठक्कर आणि लिली झॅंग या जोडीने 2-1 अशा फरकाने शरत व यांग्झी ली जोडीचा पराभव करून यू मुंबाला 7-2 अशी आघाडी मिळवून दिली. शरत व यांग्झी यांनी पहिला गेम 11-6 असा जिंकून चेन्नई लायन्सला आशेचा किरण दाखवला, परंतु यू मुंबाच्या खेळाडूंनी पुढील दोन्ही गेम 11-5, 11-9 असे जिंकले. यू मुंबाने 7-2 अशी आघाडी घेतली होती आणि बेनेडिक्ट डुडाने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या लढतीत मानव ठक्करवर 3-0 असा विजय मिळवून पिछाडी 5-7 अशी कमी केली.
डुडाने पहिले दोन गेम 11-8, 11-9 असे जिंकले. त्यामुळे तिसरा गेम डुडाला जिंकण्यात फार कष्ट घ्यावे लागले नाही. त्याने 11-4 अशी बाजी मारली. महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत दिया चितळे आणि यांग्झी लियू यांच्यात कवडी झुंज पाहायला मिळाली. दियाने सलग 6 गुण घेत 7-5 अशी आघाडी घेतली. दियाने 11-7 असा गेम जिंकून यू मुंबाचा विजय पक्का केला. लियूने तिसरा गेम 11-3 असा जिंकून पराभवाचे अंतर कमी केले.