शौचालयामुळे गावातील रोगराई हटली
भोर – भोर तालुक्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंर्तगत भोर शहर व तालुक्यात शौचालय, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक निर्मूलनाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवा आणि 50 लाखांचे बक्षीस मिळवा, ही शासनाची योजना यशस्वी होत आहे.
भोर पंचायत समितीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करून विविध कार्यक्रम राबविले तरीही शौचास बाहेर जाणाऱ्यांवर नियंत्रणासाठी “गुड मॉर्निंग’ पथके वापरून लोकांना शौचालय बांधायला प्रवृत्त केले. ग्रामीण भागातील गावात शौचालये बांधून गावे निर्मलग्राम करण्यात आल्याने रोगराई हटली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2022- 23 भोर तालुक्यात 148 वैयक्तिक लाभार्थींना 12 हजारप्रमाणे 17 लाख 76 हजार रुपते खर्च करण्यात आले असून, शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
सार्वजनिक शौचालयांसाठी 3 लाख अनुदान
ससेवाडी (सोराळी माता मंदिर), ससेवाडी (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), शिंदेवाडी (जि. प. शाळा), सारोळा (जि. प. शाळा) या 15 गावांतील सार्वजनिक शौचालयांसाठी प्रत्येकी 3 लाखांप्रमाणे 45 लाख रु. निधी देऊन या ठिकाणी कामे होऊन 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे.
पंचायत समितीकडून 12 हजार अनुदान
गावात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालये देण्यात आली, मात्र त्यानंतर विभक्त कुटुंबे आणि नवीन बांधकामे झालेल्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालयांसाठी पंचायत समितीकडून 12 हजार अनुदान दिले जात आहे. याशिवाय 100 पटांपेक्षा अधिक असलेल्या शाळांत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार आहेत.
2022-23 मध्ये सार्वजनिक शौचालय नऱ्हे (भैरवनाथ मंदिर), दिवळे (देऊळजाई मंदिर, शिंदेवाडी (वाघजाई मंदिर), केंजळ, तांभाड (कातकरीवस्ती), कामथडी (गावठाण), वेळू, आपटी (गावठाण), रायरी (धारांबे आश्रम), साळुंगण (प्राथमिक शाळेशेजारी), डेहेण (प्राथमिक शाळेशेजारी), भोर तालुक्यात 100 टक्के शौचालये पूर्ण झाली असली तरी ज्यांनी नवीन बांधकामे केली आहेत आणि ग्रामपंचायत नमुना 8 नोंदणी केली आहे, अशा लाभार्थींनी भोर पंचायतसमितीमध्ये कागदपत्रांसह संपर्क करावा. त्यांना शौचालय बांधण्यास अनुदान देण्यात येईल.
– किरणकुमार धनवाडे, गटविकास अधिकारी, भोर