पुणे – श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवलेल्या ऐतिहासिक लाल महालात आता पर्यटकांना लवकरच शिवकालीन शस्त्रांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. लाल महालात शस्त्रास्त्रे प्रदर्शन दालन आणि लाल महालातील घटनांचे मॅपिंग करून साउंड शो सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या हेरिटेज विभागाने घेतला असून त्यासाठीच्या 12 लाख 70 हजार रुपयांच्या खर्चास गुरुवारी महापालिकेच्या एस्टिमेट कमिटीने मंजुरी दिल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला लाल महाल आणखी आकर्षक होणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज बालपणी लाल महालात वास्तव्याला होते. याच लाल महालात महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्याला पळवून लावले होते. काळाच्या ओघात हा लाल महाल मोडकळीस आल्यानंतर महापालिकेने 30 वर्षांपूर्वी पुन्हा लाल महालाची प्रतिकृती उभारली. असून जगभरातून पुण्यात आलेले पर्यटक या ठिकाणाला आर्वजून भेट देतात.
जगदंबा तलवार,भवानी तलवार, ढाल…
महाराज वापरत असलेली जगदंबा तलवार, भवानी तलवार, ढाल, खांडा, समशेर, गुर्ज, चिलखत, मराठा पट्टा, मराठा धोप, बिचवा, वाघनखे, मराठा कट्यार व अन्य तलवारींच्या धातूंच्या प्रतिकृतींचा समावेश असेल. मूळ भवानी तलवार सध्या लंडनच्या म्युझियममध्ये असून, जगदंबा तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे. महाराजांच्या या शस्त्रांचा इतिहास अभ्यासकांनी बारकाईने केलेला अभ्यास व ऐतिहासिक वर्णनाच्या आधारे मूळ शस्त्रांच्या हुबेहूब प्रतिकृती करण्यात येणार आहेत.