आमदार संग्राम थोपटे : भोर-वाशी बसला हिरवा कंदिल
भोर – प्रवाशांसाठी वेगवेगळ्या फायद्याच्या योजना सुरू केल्याने एसटीला सध्या चांगले दिवस येत आहेत. एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
सोमवारी (दि. 9) भोर एसटी आगारातून चिखलगाव, टीटेघर, आंबवडे या मार्गावरून भोर ते वाशी (नवी मुंबई) कोपरखैराणे या एसटी बसला आमदार थोपटे यांनी हिरवा कंदिल दाखवून शुभारंभ केला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आगर प्रमुख प्रवीण बांद्रे, नगरसेवक गणेश पवार, समीर सागळे, बंडू खोपडे,
एसटी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, दिलीप वर्हे, संतोष केळकर, चंद्रकांत शिवतरे, भाऊसाहेब जाधव, राजू केळकर, मारुती धोंडे, स्थानक प्रमुख प्रदीप इंगवले, रवी कदम, मंगेश मळेकर, बबलू वाल्मिकी, विठ्ठल दानवले, रवींद्र धुमाळ, सोपान नवघणे, विजय मोरे, आनंदराव धोंडे, एकनाथ गायकवाड, मनोज पाटणे, सुखदेव कुंभार आदी मान्यवरांसह प्रवासी उपस्थित होते.
यावेळी आमदार थोपटे म्हणाले, पश्चिम भागातील आंबवडे, कोर्ले, टीटेघर, वडतुंबी, म्हाकोशी या भागातील नागरिक कामानिमित्त वाशी, कोपरखैराणे, पनवेल, मुंबई येथे मोठ्या संख्येने आहेत. गावी येण्या-जाण्यासाठी एसटी सेवा बंद होती ती पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी त्यांची मागणी होती.
त्यनुसार एसटीची सेवा सुरू करण्यात आली असून ही सेवा कायमस्वरूपी चालू राहावी यासाठी प्रवाशांनीही सहकार्य करावे, नव्याने सुरू झालेली चिखलगाव ते वाशी कोपरखैराणे ही एसटी भोर येथून सकाळी 11 वाजता तर कोपरखैराणे येथून रात्री 12 वाजता सुटेल असे या वेळी जाहीर करण्यात आले.
बसस्थानक लवकरच सुसज्ज होणार
भोर एसटी आगाराच्या जागेवर नवीन इमारत, सुलभ शौचालय उभारून परिसरात संपूर्ण कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून अंदाजपत्र तयार केले आहे ते लवकरच ते मंजूर होईल, त्यामुळे भोर एसटी बस स्थानक सुसज्ज होईल. हे सारे होत असताना विशेषतः ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद करू नयेत जेणेकरून विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी विशेष गाड्या सोडण्याच्या सूचना आमदार थोपटे यांनी दिल्या.