नगर -राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडून चार महिन्यांचा कालावधी झाला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला जिल्हाध्यक्ष मिळाला नव्हता. मात्र आता या गटाने देखील भाजप, शिवसेना यांच्याप्रमाणेच नगर जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष देण्याची भूमिका घेतली असून मंगळवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी कपिल पवार यांची नियुक्ती केली. अजित पवार गटाने नगर दक्षिण व उत्तर असे न करता लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन शकल्ले झाल्यानंतर शरद पवार गटाला जिल्हाध्यक्षपदाचा प्रश्न पडला नाही. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी शरद पवार यांच्याबरोबर राहीले. मात्र अजित पवार गटाला गेल्या चार महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष नव्हता. जिल्ह्यात या गटाची धूरा कोणाकडे असणार असा प्रश्न होता. कारण बहुतांशी नेत्यांनी आपण भूमिका स्पष्ट केली नव्हती. अर्थात शरद पवार गटाने मुंबईसह नगरमध्ये घेतलेल्या बैठकांमधील उपस्थिती लक्षात घेऊन आपले कोण आणि कोण गेले. त्यावरून संघटना बांधणी सुरू केली.
मात्र अजित पवार गटाचे जिल्ह्यात कोण नेतृत्व करणार याबाबत चर्चा होती. आज या गटाने नगर उत्तर अर्थात शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्ष जाहीर करून नियुक्ती देखील केली. संगमनेरमधील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी अध्यक्ष कोण हे अद्याप ठरले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी शोधा-शोध सुरू आहे.