बारामतीत इच्छुकांकडून मोर्चेबांधणी : नगरपरिषदेचे रण तापू लागले
प्रमोद ठोंबरे
बारामती – बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून 16 पुरुष व 17 महिला निवडणूक रिंगणात असणार आहेत. एकूण 20 प्रभागांपैकी 12 प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले आहेत तर 8 प्रभाग हे आरक्षित आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी इच्छुकांमध्ये चुरस निर्माण होणार आहे. यासाठी इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी, रणनिती आखली आहे.
आरक्षित आठ प्रभागांमध्ये चार प्रभागांत चार मागासवर्गीय महिला व पाच सर्वसाधारण पुरुष तर उर्वरित चार प्रभागांत चार मागासवर्गीय पुरुष व पाच सर्वसाधारण महिला रिंगणात असणार आहेत.
बारामती नगरपरिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी मोठी असते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. इच्छुकांनी राष्ट्रवादीच्या नेते मंडळीकडे चकरा सुरू केल्या आहेत. खुल्या प्रवर्गात ही स्पर्धा मोठी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा कायम आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तरीदेखील ज्या प्रभागात ओबीसींचे संख्याबळ जास्त आहे, अशा प्रभागात सर्वसाधारण गटातून ओबीसींना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खुल्या गटात चुरस होणार आहे.
ही निवडणूक सर्व ताकदीनिशी लढविणार असे म्हणणाऱ्या भाजपच्या गोटात मात्र अद्याप शांतताच दिसत आहे. गत निवडणुकीत भाजपाने पक्षाच्या चिन्हावर काही उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर बारामती विकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक विरोधक रिंगणात होते. मागील निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय आघाडी करण्यात विरोधकांना अपयश आले होते. भाजपच्या चिन्हावर लढण्यास स्थानिक विरोधकांचे एकमत नव्हते. यावेळी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी सर्वपक्षीय व स्थानिक विरोधात एकवटणार का, याकडे लक्ष लागले आहे. रासप, बहुजन समाज पार्टीची भूमिका देखील महत्त्वाची आहे.
ज्येष्ठांना संधी, इच्छुक गॅसवर
बारामती नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीत एकूण 20 प्रभागांपैकी 12 प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहेत. त्यामुळे बारा प्रभागात उमेदवारीसाठी जोरदार चुरस होणार आहे. उमेदवारीसाठी अनेकजण ज्येष्ठांकडे चकरा सुरू केल्या आहेत. तसेच इच्छुकांकडून विविध कार्यक्रमातून जनतेत पोहोचण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. 12 प्रभागांत खुल्या लढती होणार आहे. या प्रभागात विद्यमान, प्रस्थापित नगरसेवक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांना संधी मिळणार, अशी शक्यता असल्याने इच्छुक गॅसवर असल्याची चर्चा रंगली आहे.
अजितदादांचा यंग ब्रिगेडला हिरवा कंदील
बारामती तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांत यंग बिग्रेडला संधी मिळत असल्याचे अनेक निवडणुकांवरून दिसत आहे. माळेगाव, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तरूणाईला संधी दिली होती. ज्येष्ठ संचालक आणि तरूण, उद्योन्मुख शेतकरी हे सहकारात प्रवेशकर्ते झाले होते. याला अजित पवार यांची दूरदृष्टी समजली जात आहे. सहकारातील पॅटर्न हा यावेळी बारामती नगरपरिषदेत रूजणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे यंग बिग्रेडला हिरवा कंदील दाखविणार आहेत, असे संकेत मिळत आहे.