तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकक्षा रुंदावल्या
सोमनाथ कदम
सुपे – पूर्वी सुपे व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सासवड, बारामती, वरवंड आदी ठिकाणी जावे लागत होते. परंतु विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांना सुपे गावातच शिक्षण मिळायला सुरुवात झाली. महाविद्यालय सुरू झाल्याने पुरंदर बारामती दौंड या तीन तालुक्यांतील विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शिक्षणाला सुरूवात करणारे प्राथमिक ते माध्यमिक व युजीपासून ते पीजीपर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांना विद्या प्रतिष्ठानच्या छताखाली उपलब्ध होत आहे.
महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापकांची फौज आहे. महाविद्यालयाचे हरहुन्नरी प्राचार्य डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक उत्कृष्ट काम करीत आहेत. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक यशस्वी काम पाहत आहेत. विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. पोस्टर आर्ट, खाऊ गल्ली, सुजित करंडक, बोटॅनिकल गार्डन, छप्पनमेरू मंदिराभोवती वनराई वृक्ष लागवड आदी उपक्रम महाविद्यालयाने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.
महाविद्यालयात अनेक नामांकित कंपन्यांचे कॅम्पस आयोजित करून विविध विभागातील विद्यार्थ्यांना मुलाखतीतून अनेक कंपन्यांनी सिलेक्ट केले आहे. बॅंकेत व औद्योगिक क्षेत्रात माजी विद्यार्थी नोकरी करीत आहेत.
शिक्षणाला सुरुवात करणारे प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी राज्य व जिल्हा पातळीवर यशस्वी होत आहेत. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच व्यावसायिक उपक्रम, फुड प्रोसेसिंग आदी उपक्रम घेतले जातात. पालकांच्या लोकसहभागातून एक विद्यार्थी एक झाड एक पाण्याचा टॅंकर आदी उपक्रम राबवले जात आहेत. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भविष्यात करिअरचा वेध घेणारे उपक्रम शाळेमध्ये सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे संस्था प्रमुखांचे उद्दिष्ट सुपे कॅम्पसमधून साध्य होत आहे. यासाठी आम्ही व आमचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहोत.
– योगेश पाटील, प्राचार्य, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, सुपे.