कडूस – खेड तालुक्यातीच्या पश्चिमेकडील अति दुर्गम भागातील औंढे येथे विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे भागवत शंकर गायकवाड यांच्या गोठ्याला आग लागली. यात एक गाभण म्हैस 40 टक्के भाजली असून दोन म्हशीं गंभीर जखमी झाल्या असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र ओव्हाळ यांनी प्राथमिक उपचारानंतर सांगितले.
औंढे येथे सोमवारी (दि. 13) सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ठिंगण्या गायकवाड यांच्या गोठ्यावर पडल्याने गवताच्या गोठ्याने क्षणार्धात पेट घेतला.
चपळाईने निलेश शिंदे, मधुकर शिंदे, भीमराव गायकवाड, भिकाजी कांबळे, अरुण शिंदे यांनी जोरजोरात हंबरणाऱ्या म्हशींची आगीतून सुटका केली. या जळीत घटनेची माहिती मिळताच तलाठी शेलार यांनी सरपंच अशोक शिंदे, पोलीस पाटील उल्हास शिंदे, मधुकर शिंदे यांच्या समक्ष पंचनामा केला आहे.