हवेली तालुक्यात रंगणार भाजप – राष्ट्रवादीमध्ये संघर्ष
वेनवडीत बुधवारी आजादी का अमृत महोत्सव
दत्तात्रय गायकवाड
वाघोली – जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पुणे महानगरपालिका निवडणुका जरी लांबणीवर पडल्या आहेत. परंतु निवडणुका कधीही होऊ द्या, आम्ही तयार आहोत, अशी भूमिका हवेली तालुक्यातील इच्छुकांनी घेतलेली दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हवेली तालुक्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून ह्या निवडणुका सरळ आणि सहजासहजी विजयाच्या दारापर्यंत नेण्यासाठी आमदार अशोक पवार मोलाची कामगिरी करत असताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आपल्या पक्षाची मोट बांधत निवडणूका रंगतदार अवस्थेत आणल्या आहेत.
सहकार क्षेत्रात कंदांनी आपला छंद जोपासला हाच प्रवास ते कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकांवर करडी नजर ठेवत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे.
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांत नागरिकांचा त्याद्वारे विश्वास वाढेल यासाठी कंद काम करीत आहेत. याचा प्रत्यय म्हणून लोणीकंद ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवत बऱ्याच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी कंद यांनी प्रयत्न केले आहेत.
आगामी निवडणुकांमध्ये या बिनविरोध निवडणुकांचा फायदा भाजपला होईल, यासाठी कंद प्रयत्नशील आहेत.
शिरूर – हवेलीचे तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या आजारपणाच्या काळात त्यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे – नगर रस्त्यावर कंद यांनी स्वागत करून भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतेच माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने त्यांना मानणारा भाजपचा एक मोठा वर्ग आगामी निवडणुकांत मतदान रुपी आशीर्वाद देऊ शकतो, असा आशावाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या विकास कामांच्या उद्घाटनांमध्ये भाजप, राष्ट्रवादी बरोबरच केंद्रीय तसेच राज्य स्तरावरील अनेक नेते मंडळींनी उपस्थिती दर्शवत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात भाजप – राष्ट्रवादीत निवडणूक चुरशीची
बनणार आहे.
जुगलबंदीची अनुभूती लवकरच
नव्याने नियुक्त झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्याच्या युवा मोर्चाच्या दोन ते तीन दौरे करून युवा संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदार संघात भाजप आणि शिंदे गट मोलाची कामगिरी करत टक्कर देणार आहे. नागरिकांना विकासाभिमुख सेवा देण्यासाठी आमदार अशोक पवार प्रयत्नशील असून नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळप्रसंगी शासन दरबारी पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी कंद आणि त्यांची टीम तयारीत आहे. या दोघांच्या राजकीय जुगलबंदीची अनुभूती नागरिकांना लवकरच येणार आहे.
शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेत्रदीपक यश संपादन करेल. तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यानुसार तयारी सुरू आहे.
– संदेश आव्हाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते वाघोली
पुणे जिल्हा भाजपचे नेते प्रदीप कंद व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांमध्ये भाजप इतिहास निर्माण करेल. त्यासाठी हवेली तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता सज्ज झाला आहे. या कामी राज्यस्तरावरील नेत्यांचे देखील मार्गदर्शन होत आहे.
– गणेश कुटे, भाजप नेते वाघोली