येरवडा वाहतूक शाखेत मदत कक्ष सुरू
वाघोली – वाहतूक नियमभंगाचा प्रलंबित दंड नागरिकांना तडजोड करून भरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. येत्या नऊ डिसेंबर रोजी लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. त्याच्या अगोदरपासून म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून नागरिकांना येरवडा येथील वाहतूक शाखेत तडजोडीने दंड भरण्यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर खटले भरले आहेत; पण हे नागरिक न्यायालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे प्रलंबित खटल्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच थकित दंडाचे प्रमाण वाढत असून त्याचा फटका नागरिकांना बसतो.
त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाहतूक पोलिसांनी एकत्रित येत प्रलंबित दंड लोकअदालतीमध्ये तडजोडीने भरण्यासाठी नागरिकांना संधी दिली होती. त्यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयोजित केलेल्या लोकअदालत व मदत कक्षाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
ग्रामीण, शहरसाठी स्वतंत्र टेबल
शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना त्यांच्या वाहनांवर असलेला दंड तडजोडीने भरण्याची संधी राहणार आहे. हा दंड भरण्यासाठी 22 नोव्हेंबर पासून येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान नागरिकांना दंड भरता येणार आहे. यासाठी ग्रामीण, पिंपरी चिंचवड व पुणे शहर असे स्वतंत्र टेबल असणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर यांनी केले आहे.